- वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांना वाचवता आले नाही. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.
नाना पाटेकर हे आपल्या दमदार अभिनयासाठी आणि प्रभावी संवादफेकीसाठी विशेष ओळखले जात होते. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी विविधांगी भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीसह त्यांच्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाची आणि अजरामर भूमिकांची आठवण कायम चाहत्यांच्या मनात राहणार आहे.

















