न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २७ एप्रिल २०१९) :- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरली. तरीही त्यांना सर्वसामान्य जनतेला रोजगार कसा मिळेल याची चिंता नाही. तर स्वतःच्या मुलांना कसा रोजगार मिळेल याची चिंता आहे, असा राष्ट्रवादीला टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला.
शिवसेना – भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. २६) रोजी मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, आरपीआयचे जगदीश गायकवाड, शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता दळवी, बाळासाहेब पाटील, बाबनदादा पाटील, महेश बालदी आदी उपस्थित होते.
सांगुरली ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, दीपक ठोंबरे, अनंता वाजेकर आणि त्यांच्या सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
नितीन गडकरी म्हणाले, “पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या वतीने मनमोहन सिंग आणि आता राहुल गांधी हे सर्वजण केवळ गरिबी हटाओ हाच नारा देत आहेत. स्वातंत्र्यानंतर ५५ ते ६० वर्ष त्यांचेच सरकार होते. मग या काळात नेमकी कोणाची गरीबी हटली, हा प्रश्न मला पडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्या चेल्या-चपाट्यांची गरिबी हटवली आहे. ‘अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, राष्ट्रवादी काँग्रेसची गावोगाव रोजगार हमी’ असे भ्रष्ट धोरण त्यांनी राबवले आहे.
जेएनपीटी मध्ये सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. रसायनीमध्ये इस्रो आणि बीपीसीएलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यातील ८० टक्के रोजगार स्थानिकांना मिळणार आहेत. जनतेच्या आग्रहाने उमेदवारी मिळायला हवी, पण राष्ट्रवादीचा उलटा कारभार आहे. त्यांनी आई-वडिलांच्या आग्रहाने मुलांना उमेदवारी दिली आहे. देशात विकास होतोय, बदल होतोय; याचे सर्व श्रेय मोदींना किंवा बारणे यांना नाही. तर याचे सर्व श्रेय जनतेला आहे. जनतेने विश्वास दाखवला म्हणून हे घडू शकले आहे. हाच विश्वास पुन्हा एकदा दाखवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा निवडून द्या”, असे आवाहन देखील त्यांनी केले.











