न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त सोमवारपासून (दि. १५) अहिंसा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. पुढील रविवारपर्यंत (दि. २१) त्या अंतर्गत विविध धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, अध्यक्ष उमेश पाटील यांनी रविवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, सुभाष ओसवाल, हितेश सुराणा, संदेश गादिया, नितीन बेदमुथा, प्रकाश कटारिया, विरेंद्र जैन आदी उपस्थित होते. अहिंसा सप्ताहामध्ये भक्तीसंध्या, अहिंसा पुरस्कार यांच्यासह कर्करोग चिकित्सा, दंतरोग व आरोग्य चिकित्सा शिबिर, विविध वक्त्यांचे व्याख्यान अशा एकूण २५ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कासारवाडी जैन श्रावक संघ व पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्या वतीने पगारिया सभागृहामध्ये सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजता भक्तामर पठण होईल. १० वाजता जैन कॉन्फरन्स महिला विभागाच्या वतीने महिलांसाठी कर्करोग चिकित्सा शिबिर तर, इतर सर्वांसाठी रक्तगट तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता गुरू आनंद सुमति सेवा संस्थेच्या वतीने बिजलीनगर येथे रक्तदान शिबिर होणार आहे. मंगळवार (दि. १६) ते शनिवार (दि. २०) या कालावधीत नेत्र चिकित्सा शिबिर, अर्हम योगसाधना शिबिर, वक्तृत्त्व स्पर्धा, पाककला स्पर्धा, भक्तीस्तवन स्पर्धा, भक्तीसंध्या, अन्नदान, प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान, गरजू संस्थांना धान्यवाटप आदी कार्यक्रम होणार आहेत.
महासंघाच्या वतीने महावीर जयंतीला म्हणजे पुढील रविवारी (दि. २१) दुपारी ४ वाजता थेरगाव जैन स्थानक येथून अहिंसा रॅली काढण्यात येणार आहे. थेरगाव जैन युवक संघाच्या पुढाकाराने ही रॅली निघणार आहे. चिंचवड एमआयडीसी येथे या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रॅलीचा समारोप होणार आहे. तेथुन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. प्रेक्षागृहात ओम आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, अहिंसा पुरस्कार आणि बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे.