- नवीन इमारत उभारण्याच्या कामाला गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (एमआयडीसी) चिंचवड स्टेशन परिसरातील जुन्या इमारतीची सेवा क्षमता संपुष्टात आल्यामुळे ती पाडून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. तेथून उद्योजकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यामुळे शहराच्या औद्योगिक विकासाला हातभार लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उद्योगांची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन १९६० मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी) कार्यालयाची स्थापना करण्यात आली. चिंचवडमधील या कार्यालयाच्या बैठ्या एकमजली इमारतीत मंडळ अधिकारी, विविध विभागीय आणि उपविभागीय कार्यालये, लेखा व वित्त विभाग, असे विभाग विखुरलेल्या स्वरूपात होते. यामध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते.
या इमारतीतून पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांच्या विभागीय व उपविभागीय कार्यालयांचे कामकाज चालत आहे. या सर्व औद्योगिक क्षेत्रांसाठी मूलभूत सुविधा, औद्योगिक क्षेत्रामधील भूखंडासाठी इमारत परवाना, भोगवटा प्रमाणपत्र, पाणीपुरवठा अशी कामे केली जात आहेत. या इमारतीला सुमारे ६० वर्षे झाल्याने सेवा क्षमता संपल्यामुळे इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे ती पाडून नवीन इमारत उभारण्यात येत आहे.
काय असणार नवीन इमारतीत?
विखुरलेली कार्यालये एकाच छताखाली आणून त्याद्वारे उद्योजकांना सेवासुविधा पुरविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवीन अत्याधुनिक इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन प्रस्तावित इमारतीमध्ये जमिनीलगत स्टील्ट पार्किंग आणि त्यावर पोडियम व चार मजले, अशी इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत सांडपाणी प्रक्रिया, पावसाचे पाणी पुनर्भरण प्रकल्प, स्वतंत्र फायर टैंकअंतर्गत रस्ते, स्टील्ट व पोडियम लेव्हल पार्किंग, सौरऊर्जा प्रकल्प यासोबतच अंतर्गत इमारतीमध्ये मॉड्युलर वर्क स्टेशन्स, बैठक कक्ष, उपाहारगृह आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
पाण्याचा पुनर्वापर आणि सौरऊर्जा प्रकल्प
■ नवीन इमारतीमुळे उद्योजकांना सुविधा पुरविणे सोपे होणार आहे. इमारतीचे बांधकाम करताना ती पर्यावरणपूरक असावी, असा विचार करण्यात आला आहे.
■ सांडपाणी प्रक्रिया, पावसाचे पाणी पुनर्भरण प्रकल्पामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
■ संपूर्ण छतावर सौरपत्रे बसविण्यात येणार असल्याने त्याद्वारे कार्यालयाची विजेची गरज भागविली जाईल.