- उद्योजिका सुनीता गायकवाड व दिपाली भांदुर्गा ‘उत्कृष्ट उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेतर्फे फॅमिली गेट-टुगेदरचे दिमाखदार आयोजन (दि. १९) हॉटेल ’23 Eleven’ येथे केले होते. या ‘फॅमिली गेट-टुगेदर’ मध्ये शेकडो उद्योजक आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत उपस्थित होते.
कार्यक्रमास आलेल्या उद्योजकांच्या पत्नीची तसेच त्यांच्या मुलांचे ‘इंट्रोडक्शन’ घेण्यात आले. त्यानंतर चाकण भोसरी MIDC उद्योजिका संघटना प्रमुख पौर्णिमा प्रवीण शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये उद्योजिका ग्रुपने कोणकोणते सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रम घेतले याचा ‘पीपीटी’द्वारे आढावा दिला. सर्व उद्योजिका महिलांना असे आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येने उद्योजिका संघटनेमध्ये सहभागी व्हावे.
त्यानंतर चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेतर्फे यावर्षीचे दोन उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार हे अमेया इंडस्ट्रीजच्या संचालिका सुनिता किसन गायकवाड व सिद्धकला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका दिपाली सुधीर भांदुर्गा यांना देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. या दोन्हीही उद्योजिकांचे पती ज्या वेळेस दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये नोकरी करत होते, त्यावेळेस जवळपास दीड ते दोन वर्ष यांनी स्वतःचा नवीन कारखाना सांभाळला व कारखाना ज्या वेळेला चांगला चालायला लागला त्यावेळी त्यांच्या पतींनी ती नोकरी सोडून उद्योग फुल टाईम जॉईन केला.
सुनीता किसन गायकवाड व दिपाली सुधीर भांदुर्गा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या फॅमिली गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे व संचालक प्रवीण शिंदे यांनी मोलाचा वाटा उचलला.
चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी आभार मानले.