न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील वाकड-हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान २७ लाखांची रोकड पकडली. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (दि. २३) रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई केली.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मतदार संघात राजकीय हालचाली वेगात सुरु झाल्या असून उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. यात नाकाबंदी करण्यात येत आहे.
संयुक्त पथकाकडून नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी गाडी येत होती. पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत रोकड मिळून आली. व्यावसायिक असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीची रोकड आणि गाडी जप्त करण्यात आली असून, पिंपरी- चिंचवड पोलिसांनी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला घटनास्थळी पाचारण केले होते.