न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- नृत्य तेज अकॅडमीच्यावतीने ”नृत्य महोत्सव’ ‘चे सोमवार (दि. २९) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजन करण्यात आले आहे.
तेजश्री अडिगे संचालित नृत्य तेज अकॅडमीच्यावतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्य शैलीच्या शिबिरास दि. १४ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये ४ ते ४० वयोगटातील ८० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या शिबिराच्या समारोपाचा कार्यक्रम जागतिक नृत्यदिनानिमित्त होणार आहे. यात सेमी क्लासिकल, सिने बॉलीवूड नृत्य, बेलीनृत्य, कॉन्टेमपरी नृत्य, भारतीय नृत्य असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धक सादर करणार आहेत. या शिबिराकरिता तेजश्री अडिगे, बंटी धारिवाल, मनाली गोवंडे, भानुप्रिया दोशी, बेली डान्सर, साक्षी ताजणे यांनी शिबिरार्थींना नृत्याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी बेस्ट युवा कलाकार लावणी नृत्यांगना सुजाता कुंभार, नटरंग अकॅडमीचे जतिन पांडे यांना बेस्ट नृत्य गुरु पुरस्कार देण्यात येणार आहे. या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणा-या बाल कलाकार, युवा कलाकार व गुरु यांचा सत्कार होणार आहे. यावेळी लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम हे उपस्थित असणार आहे. कोहिनुर ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे उद्योगपती कृष्णकुमार गोयल व विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नृत्य तेज अकॅडमीच्या संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी दिली आहे.











