न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २८ एप्रिल २०१९) :- रहाटणीतील शिवसेना उपविभाग प्रमुख व शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते विकास एकशिंगे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत घड्याळ हाती घेतले आहे.
महाआघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ व पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडणुक प्रक्रियेत विश्वासात घेतले नसल्याचे कारण पुढे करत, त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे व आदी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांपासून विकास एकशिंगे हे धनुष्यबाण हाती घेऊन शिवसेनेत कार्यरत होते. त्यांनी २००७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकही लढविली होती. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका व चिंचोलीतील मोठा समाजबांधव काळेवाडी, रहाटणी व शहरातील विविध भागात कामानिमित्त वास्तव्यास आहे. हा संपूर्ण समुदाय एकशिंगे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच एकशिंगे यांचा व्यावसायिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही दांडगा संपर्क आहे. एकशिंगे यांनी शिवसेनेस रामराम केल्यामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.











