- वाहकाला स्कॅनर दाखवताच तिकीट मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) बससेवेत प्रवाशांच्या अडचणी कमी होणार आहेत. पीएमपीएल प्रशासनाकडून ‘पीएमपी गो’ नावाचे मोबाईल अॅप येत्या दोन आठवड्यांत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. तसेच याद्वारे पीएमपी प्रवाशांना सद्यस्थिती अथवा बसच्या मार्गाची माहिती गो अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.
‘पीएमपी’कडून प्रवाशांना वेगवेगळ्या उत्तम सुविधा, देण्याचे काम केले जात आहे. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून जादा बसगाड्या पीएमपी सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. सध्या अनेक छोटे मोठे व्यवहार कॅशलेस पध्दतीने स्वीकारले जातात. त्यामुळे पीएमपीमध्ये ऑनलाईन तिकिटाची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांना ‘क्युआर कोड’च्या माध्यमातून तिकीट दिले जात होते. पण आता पीएमपी प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. कारण प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येणार आहे.
बसचा मार्ग गो अॅपच्या माध्यमातून कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पीएमपी सेवा पूर्णपणे डिजिटल झाली आहे. प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या बैठकीत काही त्रुटी, अंतिम निर्णय घेऊन प्रायोगिक तत्त्वावर हे अॅप सुरू करण्यात येणार आहे. ‘पीएमपी गो’ या अॅपमध्ये बसचे सर्व मार्ग आहेत. त्यामुळे या अॅपचा फायदा बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही होऊ शकतो.
असा करा अॅपचा वापर..
- वाहकाला स्कॅनर दाखवताच तिकीट मिळणार.
- अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध.
- पीएमपीच्या सर्व मार्गाची माहितीदेखील उपलब्ध.
- बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास अॅपद्वारे ऑनलाइन काढण्याची सुविधा.
- अॅपच्या माध्यमातून बसची रिअल टाइम माहिती मिळणार.
- नियोजित बसचे शेड्यूल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावरूनही तिकीट काढता येणार.