न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- महामेट्रोने कामाचा ठेका दिलेल्या मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेने कामगांरांचे मासिक पगार व पीएफ माहे डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत दिलेला नाही. तसेच काही कामगारांना कामावरून निलंबितही करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीविरोधात उपोषण व आंदोलन करण्याचे ठरविले आहे. कामगारांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पिं. चिं. मनपा आयुक्त, पिं. चिं. शहर पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त पुणे, महामेट्रो कार्यकारी संचालक, व्हाईस प्रेसिडेंट अल्फरा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. अंधेरी मुंबई यांना याबाबतचे निवेदन पाठविले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ”पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरु असून, हे काम महा मेट्रोने मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. ह्या कंपनीकडून विविध विभागात शंभर कामगार काम करत होते. या कामगारांचे डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत ५ महिन्यांचा पगार झालेला नाही. या कामगारांचे मासिक पगार थकीत असून, त्यातील काही कामगारांना एक महिन्याचा पगार दिला आहे. तर काही कामगारांना दोन महिन्याचा पगार देऊन सक्तीने राजीनामे लिहून घेतले आहेत.
उर्वरित कामगारांना राजीनामा न देल्यास सक्तीने कामावरुन काढणार, अशा धमक्या देत आहे. दोन महिन्याचा पगार घेऊन राजीनामा दिल्यास उर्वरित दोन महिन्याचा पगार मिळण्याची कामगारांना शाश्वती नाही. त्यामुळे कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. कंपनीने बळजबरीने या सर्व कामगारांना निलंबित केले आहे.
त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात या कंपनीचे कामगार प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, अरुण गायकवाड, अलिम तांबोळी, मोहन गायकवाड, आनंद कुमार, विनोद बिसेन या सर्व कामगारांनी वल्लभनगर एस टी स्टेन्डशेजारी मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयासमोर बुधवार दि. १ मे २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून आमरण उपोषण सुरु करणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, अरुण गायकवाड यांच्या सह्या आहेत.


















