- मा. उपमहापौरांच्या व निगडी प्राधिकरण रेसिडेन्शियल फोरमच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणातील महावितरण कार्यालयास घेराव..
- मुदतीत वीज समस्या न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही-लाही करणारे तापमान आहे. अशातच निगडी प्राधिकरण परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी मंगळवारी (दि. २८) रोजी मा. उपमहापौर शैलजा अविनाश मोरे व निगडी प्राधिकरण रेसिडेन्शियल फोरम यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणातील महावितरण कार्यालयास घेराव घातला. वीज समस्या सोडविण्याची मागणी केली. मुदतीत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
याबाबत माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे अनुप मोरे,राजेंद्र बाबर, प्रतिभा दलाल, अर्जुन दलाल,पंकज जाधव, प्रसेन अष्टेकर, नरेंद्र येलकर, आर. एस कुमार, सचिन बनसोडे, मकरंद गोवर्धन, कृशांक पटेल, भारती नलावडे, मधुरा जोगळेकर, माधुरी पळसे, प्रमोद घुले आदी उपस्थित होते.
माजी उपमहापौर शैलजाताई मोरे म्हणाल्या, वीज समस्यामुळे प्रभाग क्रमांक १५ निगडी-प्राधिकरणातील नागरिक वैतागले आहेत. विजेअभावी उपकरण बंद असल्याने लहान मुलांना देखील तीव्र उन्हाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तसेच नागरिकांचे ऑनलाइन कामेही होत नाहीत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील उद्योजकांचे देखील मोठे नुकसान होत आहे. विज गेल्यानंतर महावितरण कार्यालयात फोन केला असता कर्मचारी फोन उचलत नाहीत. तसेच उचलल्यास समस्येचे निराकरण करत नाहीत. यासंदर्भात वेळोवेळी वरिष्ठ अधिका-यांशीही स्थानिक नागरिकांनी संपर्क साधला आहे. मात्र, समस्या सुटत नाही. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना याचा जाब विचारला. तसेच येत्या तीन दिवसात वीज समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्या कालावधीत समस्या न सुटल्यास महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले.











