न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा अदखलपात्र गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अण्णा बनसोडे यांच्यासह रविंद्र हृदयनारायण दुबे (वय- ४३ रा. कामगारनगर, पिंपरी) याच्यावरही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील लिंकरोड पत्राशेड परिसरात स्विफ्ट गाडी (एमएच १४ एफएक्स ४५५३) या गाडीत बसून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केले जात होते. हा प्रकार सोमवारी (दि. २९) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडला होता.
निवडणुकीच्या दिवशी पोलिसांना लिंकरोड पत्राशेड परिसरात पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये ४८ हजार ५०० रुपये मिळाले. यावरून अण्णा बनसोडे यांच्यावर कलम १७१ ब (१) व १७१ ई प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे करीत आहेत.











