- निगडीतील ज्वेलर्सचे दुकान फोडल्याच्या गुन्ह्याची उकल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- निगडी प्राधिकरण येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकानाचे शेटर उचकटुन त्यातील तिजोरी फोडुन त्यामधील सुमारे ३० तोळे सोन्याचे दागीने, १० किलो चांदी, रोख रक्कम १८,००० हजार रुपये व तेथील डिव्हीआर चोरुन नेल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने लाल रंगाची श्रेवोलेट एंजॉय गाडी गुन्ह्यात वापरल्याचे निष्पन्न करुन पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील सरकारी व खाजगी असे एकुण २५० ते ३०० सीसीटीव्ही तपासुन हडपसर भागातून गाडी निष्पन्न केली.
रेकॉर्ड वरील कुख्यात आरोपी विकीसींग जालींदरसींग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) याला गुन्हयात वापरलेल्या वाहनासह ३ ते ४ दिवसांपुर्वी पाहण्यात आले होते. आरोपीवर यापुर्वी दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न इत्यादि गंभीर ९० गुन्हे दाखल असल्याचे तसेच तो नेहमी पत्ते बदलुन राहत असल्याचे माहिती मिळाली. आरोपी हा नेहमी शस्त्र वापरत असल्याने व यापुर्वी पोलीसांवर फायरींग केली गेल्याची माहिती मिळाल्याने त्यास पकडने आव्हानात्मक होते. त्या अनुषगाने निगडी पोलीस ठाणे तपास पथकाने सलग ३ दिवस रामटेकडी हडपसर भागात वॉच ठेवुन दि.३०/०५/२०२४ रोजी रात्री तो रामटेकडी परीसरातील घरी येण्याची माहिती मिळाल्याने अतिरीक्त कुमक मागवुन निगडी तपास पथकाने त्याला पहाटे ०१/०० वा दरम्यान त्याच्या घरास वेढा घालुन व बळाचा वापर करुन त्याचे घरात घुसुन आरोपीला अटक केली. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास करता, त्याने त्याचे तीन साथीदारासह निगडी पोलीस ठाणे येथील ज्वेलरी शॉप फोडल्याचा, बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दित एक बंद फ्लॅट फोडल्याचा, डोंबीवली पोलीस ठाणे हद्दितील एक चारचाकी वाहन चोरल्याचा असे एकुण ३ गुन्हे केल्याचे निष्पन्न केले.
आरोपी याने निगडीतील आरोपीच्या वाटयास आलेले चांदी व सोने दागिने हे सोनार अब्दुल्ला ताहीरबक्ष शेख (वय ५८ वर्षे धंदा ज्वेलर्स रा. फ्लॅट क्र. ७१७, पनामापार्क सोसायटी, पोरवाल रोड, धानोरी लोहगाव) यास विकल्याचे निष्पन्न झाल्याने सदर सोनारास अटक करुन त्याचेकडुन १०० ग्रॅम सोन्याची लगड, ८ किलो ३०० ग्रम वजनाची चांदीची विट, गुन्हयात वापरलेले श्रेवोलेट एंजॉय गाडी, घरफोडीचे सहित्य व दोन तलवार असा एकुण २५,००,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा आणखी तपास सुरु आहे.