न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतपेट्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बालेवाड़ी क्रीडासंकुलात ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीचे काम याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे क्रीडानगरीला छावणीचे स्वरूप आले आहे.
या दोन्ही मतदारसंघात सोमवार (दि.२९) रोजी मतदान झाले आहे. त्यानंतर मतपेट्या बंदोबस्तात या ठिकाणी आणण्यात आल्या. मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ मोठे असल्याने खासगी ट्रक, एसटी बसच्या माध्यमातून या पेट्या आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्रोंगरूमच्या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलिस, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याखेरीज मतदान अधिका-यांचीही या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. तोपर्यंत ही सुरक्षाव्यवस्था कायम राहणार असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.











