न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे. २०१९) :- पिंपरी विधानसभेचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटप करून, लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभन दाखविल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी मावळ लोकसभेचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी मतदार राज्याला विकत घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न केल्याचे सिध्द झाल्याने, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेब माजी आमदाराकडुन पैसे वाटप करणे, म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतुन अधिकाराचा म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटणे होय.
आपण तात्काळ गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेऊन, निवडणुक लढविण्यासाठी बनसोडे यांना अपात्र ठरवून, त्यांना कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घालावी. अन्यथा आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.











