- संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात सहभागी हुतात्म्यांना आदरांजली
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०१९) :- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीच्या वतीने चिंचवड येथे संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात सहभागी झालेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांचे वडील सोपानराव भोर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात चौदा दिवस तुरुंगात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भायखळा येथे ०३ जून १९५६ साली मोर्चा काढण्यात आला होता. मुंबईतील चौपाटी येथे पंडित नेहरू यांचे भाषण झाल्यानंतर, या सर्वांना मुक्त करण्यात आले होते. यावेळी त्यांना उपस्थितांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कामगार क्षेत्रात कार्यरत सखुबाई आणि हनुमंत दिंडोरे यां बांधकाम मजूर दाम्पत्याचा विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर, मॉर्डन महाविद्यालयाचे शरद इनामदार, माधुरी गुरव, प्रकाश देवाडीकर, विजयराव देशपांडे, धनाजीराव शिंदे, नाना कांबळे, संभाजी बारणे, बांधकाम कामगार सेनेचे जयंत शिंदे, सतीश भांडेकर, दीपक म्हेत्रे, फोरमचे उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, अरुण बकाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आयटी सेलचे विशाल पठारे, दुर्गा भोर, उद्योजक संजय कुलकर्णी, संतोष गुरव, व कार्यकर्ते, उद्योजक तसेच कामगारवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अभय भोर म्हणाले की, हाताने काम करणाऱ्या श्रमाला प्रतिष्ठा आणि मानवी श्रमाला योग्य आर्थिक मोबदला मिळावा, ही महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनांची प्राथमिक मागणी होती व आजही आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील श्रमकरी, कष्टकरी, रोजंदार, छोटे व्यावसायिक, लघुउद्योजक आदी बेरोजगारीने त्रस्त आहेत. प्रचंड बेरोजगारी सतत वाढत आहे. साम्राज्यशाही प्रवृत्ती जगाचे आर्थिक स्वातंत्र्य गिळंकृत करीत आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जागतिकीकरण आणि खासगीकरण यांच्या पिळवनुकीमुळे ‘कामगार’ ही संकल्पनाच संपविण्याची प्रक्रिया भारतात सुरू झाली आहे. त्याचे रुपांतर ठेकेदारी, सेवेकरी, स्वतंत्र व्यावसायिक मानवी शक्तींचे विक्रेते या संकल्पनेत होत आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये १०५ हुतात्मे झाले. त्यांच्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. पण, तो महाराष्ट्र टिकवायचा असेल तर, सर्वांनी एकत्र येऊन, पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर्थिक बाजूने सक्षम करण्यासाठी, बेरोजगारी हटवून, कामगारांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी मोठी चळवळ उभारली पाहिजे. त्याकाळी अडीच लाख कामगारांचा मोर्चा निघाला होता. आज खऱ्या अर्थाने पुनर्निर्माणाची आवश्यकता आहे.
मुक्त अर्थव्यवस्थेसाठी जागतिकीकरण, खासगीकरण यांच्या मार्गानेच आर्थिक स्वातंत्र्यासाठी रोजी-रोटी, निवारा, उद्योग यासारखी चळवळ सर्व महाराष्ट्राने एकत्रित येऊन उभारण्याची आवश्यकता आहे. त्याचं नेतृत्व कामगार संघटनांनीच करण्याची आवश्यकता आहे. तो खरा ‘कामगार दिन’ संकल्पनेचा विजयी दिवस असेल, असे प्रतिपादन भोर यांनी यावेळी केले.
मारुती बाणेवार यांनी निवेदन तर, सुनील घोडेकर यांनी आभार व्यक्त केले.











