न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२४) :- नागरिकांना सकाळी व सायंकाळी नैसर्गिक वातावरणात व्यायाम करता यावा, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील उद्यानांमध्ये ओपन जीम तयार केल्या आहेत. लहान मुलांसाठी खेळणी देखील बसविण्यात आली आहेत. परंतु, या साहित्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य तुटल्यामुळे त्यांचाही हिरमोड होत आहे. सर्व उद्यानातील साहित्य त्वरीत नव्याने बसविण्यात यावे, अशी सूचना महापालिका क्रीडा समितीचे मा. सभापती तथा मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये नखाते यांनी म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा मतदार संघात महापालिकेने तयार केलेली जवळपास 37 उद्याने आहेत. उद्यानातील वेगवेगळ्या जातीच्या झाडांमध्ये पर्यावरणातील प्रदुषणाची पातळी कमी करण्याची क्षमता असते. या नैसर्गिक वातावरणात सकाळी व सायंकाळी नियमितपणे वॉकींग, जॉगींग, व्यायाम, योगा, प्राणायाम करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, तरुण, तरुणी, महिला वर्ग उद्यानात जात असतात. उद्यानात व्यायाम करता यावा, यासाठी ओपन जीम तयार केल्या आहेत. परंतु, महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत उद्यान विभागाकडून या उद्यानांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
उद्यानातील ओपन जीमचे साहित्य तुटले आहे. डबल बारचे रॉड जमीनीत खचल्याने लेवल बिघडली आहे. डबल व्हील शोल्डर, लेग प्रेस, पॅरलल बार्स, सायकल, अॅब्स शेपर, चेस्ट प्रेस, सिंगल-डबल ट्वीस्टर आदी व्यायामाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. काही साहित्य जमिनीतून उखडून पडले आहे. अर्धवट साहित्याचा वापर करत व्यायाम करताना नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लहान मुलांकरिता असणारी गसरगुंडी, सिसो, पाळणे, झुले, झोके, अप-डाऊन, फिरते पाळणे, बदक आदी साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे खेळण्यासाठी येणा-या लहान मुलांचा हिरमोड होत आहे.
महापालिकेकडून सर्वच उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, उद्यानांतील तुटलेल्या साहित्याकडे उद्यान व क्रीडा विभागाचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून लहान मुलांचा हिरमोड होत आहे. याठिकाणी ओपन जीमचे साहित्य व खेळणी नव्याने बसविण्यात यावीत, अशी सूचना नखाते यांनी आयुक्तांकडे केली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील खालील उद्यानांची दुरवस्था…
1) राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे सौदागर
२) 8 to 80 उद्यान, पिंपळे सौदागर
3) लिनियर उद्यान, पिंपळे सौदागर
४) काटे उद्यान, पिंपळे सौदागर
५) कामटे शहीद उद्यान, पिंपळे निलख
६) प्रभाकर साठे उद्यान, पिंपळे निलख
७) सावतामाळी उद्यान, वाकंड
८) तानाजी कलाटे उद्यान, वाक्ड
२) ऑक्सिजन पार्क, पुनावळे
१०) बौद्ध विहार, पुनावळे स्मशान भूमी
११) सावित्रीबाई ज्ञानज्योती उद्यान, जगताप डेअरी
१२) जिजाऊ गार्डन, कुणाल आयकॉन समोर
१३) संत ज्ञानेश्वर उद्यान, रावेत
१४) राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान, रावेत
१५) शाहू उद्यान, बिजलीनगर
१६) रघु माऊली उद्यान, बिजलीनगर
१७) सावरकर उद्यान, प्रेमलोक पार्क, चिंचवड
१८) गणेश मंदिर उद्यान, दळवी नगर
१९) दत्तात्रय मरळ उद्यान, पवनानगर, चिंचवड
२०) जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड
२१) राजमाता जिजाऊ उद्यान, चिंचवड
२२) गणेश बाग, तानाजी नगर, चिंचवड
२३) सावित्रीबाई फुले उद्यान, चिंचवड
२४) काकडे पार्क, चिंचवड
२५) संभाजी महाराज उद्यान, रहाटणी
२६) जय सीताराम उद्यान, रहाटणी
२७) लक्ष्मि बारणे उद्यान, थेरगाव
२८) बापूजीबुवा उद्यान, थेरगाव
२९) बोट क्लब, थेरगाव
३०) शहीद तुकाराम उबाळे उद्यान, पोलीस लाईन थेरगाव
३१) जोग महाराज उद्यान, पिंपरी गाव
३२) कै. हरिभाऊ वाघेरे उद्यान, पिंपरी
३३) हेमू कलानी उद्यान, पिंपरी
३४) नंदू जाधव उद्यान, पिंपरी
३५) डेरी फार्म उद्यान, पिंपरी
३६) लाल बहादूर शास्त्री उद्यान, पिंपरी
३७) साधू वासवानी उद्यान, पिंपरी












