- पिंपरी चिंचवडमधून थेट विधान परिषदेच्या आमदारपदी निवड..
- भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके हे देखील विजयी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातून भाजपचे अमित गोरखे यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड झाली आहे. त्यांना पहिल्या पसंती क्रमांकाची २३ इतकी मतं मिळाली आहेत. तर भाजपचे दुसरे उमेदवार योगेश टिळेकर आणि पंकजा मुंडे हे देखील पहिल्या पसंतीची २६ इतकी मतं घेऊन विजयी झाले आहेत. अजूनही मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांचे निकाल यायला विलंब होणार आहे.
निवडणूकीसाठी आज शुक्रवारी (दि. १२) रोजी मतदान पार पडले. दुपारी पावणेचारच्या सुमारास १०० टक्के मतदान पूर्ण झाले. साधारण सायंकाळी पाचनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी २५-२५ मतांचे दहा गठ्ठे आणि एक गठ्ठा २४ मतांचा करण्यात आला होता. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पार पडली. एकूण २७४ आमदारांनी मतदान केले होते. समान पसंती दिल्याने पैकी एक मत बाद झाले. भाजप ५, शिवसेना शिंदे गट २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शेतकरी कामगार पक्ष १, काँग्रेस १ व उबाठा शिवसेना १ असे १२ उमेदवार रिंगणात होते.
अमित गोरखे यांना मिळालेल्या एका मतपत्रिकेवर इंग्रजी आकड्यावरून गोंधळ उडाला होता. सर्वपक्षीयांनी गोधळ घातला होता. शेवटी ते मत अमित गोरखे यांनाच मिळाले.
गोरखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात ते वास्तव्यास आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व, एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनची नाळ आहे. न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषदेचे आमदार असा त्यांचा प्रवास आहे.
दरम्यान भाजपकडून पिंपरी चिंचवड शहरातून अमित गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली होती. त्यासाठी ते दिवसभर मुंबईत ठाण मांडून होते. आज सकाळीच त्यांनी मुंबईतील श्रीसिद्धीविनायक मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनी बाप्पांचे आशीर्वाद घेतले. अखेर त्यांना बाप्पा पावलाच आणि ते विधानपरिषदेचे आमदार झाले.















