न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अद्यापही वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी महामार्गावर ९ ठिकाणी उड्राणपूल बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला आहे.
त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीचा वेग वाढणार आहे. पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळतात. त्यामुळे दरडी काढण्याच्या कामादरम्यान किंवा मोठा अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्यानंतर येथील वाहतूक पुणे मुंबई महामार्गावर वळवली जाते. तसेच
अनेकदा सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात.
महामार्गावरील चौकात यू-टर्न घेण्यासाठी तसेच पलीकडे वळण्यासाठी मुख्य रस्यावरुन जावे लागते. त्यामुळे एखाद्या वाहनाने वळण घेण्यासाठी गाडी थांबली, तरी पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ९ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यामुळे देहरोड ते लोणावळ्यापर्यंत ९ ठिकाणी उडाणपूल होणार असल्याने सरळ वेगाने वाहने पुढे जाणार आहेत.
असा असेल मार्ग
सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव-चाकण रस्ता, एमआयडीसी वडगाव, देहरोड वाय जंक्शन, वडगाव फाटा, निगडी फाटा ते कामशेत, कार्ला फाटा, कान्हे फाटा, अशा नऊ ठिकाणी उडडाणपूल बांधण्याचे नियोजन एमएसआरडीसी ने केले आहे. यासाठी सुमारे ३६ कोटींचा ख़र्च अपेक्षित आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाची या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढून या कामाला सुरूवात केली जाणार आहे.











