न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- BMW कारची आणि स्कूल बसची एकमेकांना धडक लागल्याने अपघात घडला आहे. हा अपघात पिंपरीतील सायन्स पार्क परिसरातील बीआरटी मध्ये घडला. या अपघातात शाळेतील दोन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूलबस विरुध्द दिशेने जात होती. त्याचवेळीस BMW कार भरधाव वेगाने आली. दोन्ही वाहनांची एकमेकांना धडक झाली. या धडकेत स्कूल बसची समोरील काच फुटली आणि कारचे देखील भरपूर नुकसान झाले. बसमध्ये 15 विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातातून सुदैवाने 13 विद्यार्थी सुखरुप वाचले. ही घटना दुपारी सुमारे 12.30 च्या आसपास घडली.
अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पालकांनी आणि नागरिकांनी धाव घेतली. या प्रकरणी संतप्त पालकांनी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अपघातानंतर विद्यार्थी घाबरले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. जखमी विद्यार्थ्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


















