- सहा महिन्यांसाठी मिळणार इतका ‘स्टायपंड’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १२ वी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या सुमारे ५७५ युवकांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची तसेच उद्यमशीलता क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिका करणार असून त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागात सुमारे ५७५ युवकांना कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून १८ ते ३५ या वयोगटातील १२ वी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या युवकांनी rojgar.mahaswayam.gov.in या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले अर्ज ऑनलाईन पद्दतीने सादर करावे, असे जांभळे पाटील म्हणाले. युवकांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच सर्व सेतू सुविधा केंद्रांच्या ठिकाणी आणि मोबाईलद्वारे या योजनेचा अर्ज भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ वी उतीर्ण उमेदवाराला दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका उतीर्ण उमेदवाराला दरमहा ८ हजार रुपये तसेच पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उतीर्ण उमेदवाराला दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी ६ महिन्याचा राहणार. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी केले आहे.
युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडतो. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. युवकांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देऊन त्यांच्यात रोजगाराबाबत सर्व क्षमता निर्माण करण्यासाठी महापालिका ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या एकूण पदांच्या ५% पदे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तात्पुरत्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. त्यानुसार विविध विभागांच्या मागणीनुसार एकूण ५७५ जागा भरण्यात येणार आहेत. – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका












