- तोपर्यंत भारतीय संविधान बदललं जाणार नाही – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२४) :- विरोधकांकडून भारताचे संविधान बदलणार असल्याचा आरोप सरकारवर केला जातोय. जे मौल्यवान संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेलं आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारतीय संविधान बदललं जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथे व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रेचे निगडी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. निगडी येथून पिंपरीतील एचए मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पिंपरीतील एचए मैदानावरील सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आ. बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, लाडकी बहिण योजना गरीब महिलांसाठी आहे. केवळ महिला, मुलींनाच नव्हे तर भावांना सुध्दा योजना दिल्या आहेत. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना साडेसात एचपीपर्यंत वीज माफी दिली. आता त्यांनी मागील वीज बिलाची चिंता करायची नाही, यापुढचे बील भरायचे नाही. तसेच, दुधाला पाच हजार रुपये अनुदान सुरु केलं. युवक युवतींना व्यवसायिक प्रशिक्षण देण्याकरिता सहा, सात तसेच आठ हजार रुपये स्टायफंड सुरु केला. सरकारने सुरु केलेल्या योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे.
लाडकी बहिण योजनेंतर्गत तब्बल ९० लाख महिला भगिनींच्या बॅंक खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा केले. विरोधकांनी ही योजना चुनावी जुमला असल्याचे सांगून राज्य सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या बॅंक खात्यात जमा झालेले पैसे पुन्हा सरकार परत घेणार असल्याच्या अफवा पसरवल्या. कोणी जर असं म्हणत असेल तर त्याची जीभ हासडून काढीन. कारण, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांच्या विचारांचा वारसा जपणा-या महाराष्ट्रात असे कदापी घडून देणार नाही, असे ही अजित पवार यावेळी म्हणाले.
गॅस सिलींडर योजनाच नव्हे तर रस्ते, रिंगरोड, विमानतळ अशी असंख्य विकास कामे सरकारला करावी लागतात. त्यामुळे राज्य सरकारने तीन घरगुती सिलींडर देण्याची योजना सरकारने आणली आहे. तीन सिलींडरची रक्कम महिलांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
पींक रिक्षाद्वारे महिलांना संधी मिळाल्यानंतर संधीचं त्या सोनं करतात, हे मला त्यांच्याकडून पहायला मिळाले. त्यांच्या रिक्षातून प्रवास करताना पुरुषाला लाजवेल असा प्रकारे अत्यंत स्मूथ रिक्षा त्यांनी चालवला. १७ शहरामध्ये पींक रिक्षा योजना राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
झोपडपट्टीमध्ये राहणा-या बंधू भगिनींसाठी झोपडपट्टी निर्मुलन योजना राबवून पक्की घरे बांधली जातील. नुकतेच भाटनगर झोपडपट्टीबाबत निवेदन स्विकारल्यानंतर आयुक्तांची उद्याच बैठक बोलावली आहे. त्यावर त्वरीत मार्ग काढला जाईल. तेथे बांधलेली घरे जीर्ण झाली आहेत. पडझड होत आहे. सुरक्षाभींत नाही, त्याठिकाणी पक्की घरे बांधून देण्याचे काम आपण करणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.















