न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२४) :- घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला पिंपरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह महाराष्ट्र व गुजरात मध्ये ०८ घरफोडी केल्याचे उघड करुन त्याच्या ताब्यातुन १२,३४,०९७ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुख्य आरोपी मोहम्मद रेहान अफताब शेख (वय ४८ वर्ष, सध्या रा. उबाळे नगर वाघोली, मुळ रा. बैंगनवाडी, शिवाजीनगर, कमलानगर, गोवंडी, मुंबई), त्याचा साथीदार पाहिजे आरोपी १) गजराज मोतीलाल वर्मा (वय अंदाजे ४० वर्ष, रा. मध्यप्रदेश) २) सुरू चौधरी (वय अंदाजे २५ वर्ष, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
दरम्यान दि. २२/०६/२०२४ रोजी रात्री २३.३० वा. ते दि. २३/०६/२०२४ रोजी सकाळी १०.४५ वा. च्या सुमारास विकी वाईन्स, चिंचवड स्टेशन चौक येथील दुकानाचे शटर उचकटुन अज्ञात चोरटयांनी वाईन्सच्या दुकानामध्ये प्रवेश करुन घरफोडी चोरी करून १०,७५,००० रू. चा एकूण माल, त्यात रोख रक्कम व विदेशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल चोरी करुन चोरुन नेला होता. या प्रकाराबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता.
पोलिसांनी पिंपरी चिंचवड व पुणे शहर हद्दीतील २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. वल्लभनगर एसटी स्टैंड परिसरात सापळा रचुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. तसेच तपासादरम्यान अटक आरोपीच्या ताब्यातुन एकुण १२,३४,०९७ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.














