- तब्बल सात हजार दुबार नावांची यादीत घुसखोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत मतदार यादीतील दुबार नावांचा घोळ कायम आहे. पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत तब्बल सात हजारांवर दुबार नावे असल्याचे पडताळणीत निदर्शनास आले आहे. सर्व मतदारांना दुबार ओळखपत्र दिली आहेत. मतदारयादीतून दुबार नावे वगळावीत, अशी मागणी होत आहे.
निवडणूक विभागाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी तयार केली. ६ ऑगस्ट २०२४ रोजी ती प्रसिद्ध केली. मतदारयादीवर हरकती आणि सूचनेसाठी १९ ऑगस्ट ही अखेरची मुदत होती. दरम्यान, यादीच्या तपासणीत अत्यंत गंभीर अशा त्रुटी आढळल्या आहेत.
मतदारांकडे असलेल्या वेगवेगळ्या क्रमांकांची स्वतंत्र ओळखपत्र आहेत. त्यामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद बनली आहे. तसेच अशा प्रकारांमुळे लोकशाही धोक्यात येते. प्रारूप यादीमध्ये काही मतदारांची नावे त्याच यादीत दुबार नोंदविलेली आहेत आणि अशा मतदारांना दुबार ओळखपत्रही दिली आहेत.
काही मतदारांची नावे लगतच्या भागातील इतर मतदारयादीत नोंदविली असून, त्या ठिकाणीही मतदारांकडे दुबार ओळखपत्र दिले आहे. तसेच काही मतदारांची नावे मतदारसंघातील इतर भागात नोंदविली असून, अशा मतदारांनासुद्धा दुबार ओळखपत्र देण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी पुरुष मतदाराचे नाव दुबार नोंदविले गेले असून, एका ठिकाणी पुरुषाचा, तर दुसऱ्या ठिकाणी महिलेचा फोटो लावला आहे.
लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या तरतुदीनुसार दुबार मतदार नोंदणी व दुबार ओळखपत्र असलेल्या मतदारांची नावे रद्द करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करावी, निवडणूक विभागाकडे त्यासंदर्भात पुराव्यांसह तपशिलवार यादी दिली आहे. मतदारयादीतून दुबार ओळखपत्र असलेली नावे तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.











