न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- केंद्र व राज्य सरकारकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मिळालेले सुमारे १११ कोटी रुपये महापालिकेने केंद्र व राज्य सरकारला परत पाठविल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे.
सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बन्सी भिवाजी शिंदे यांनी महापालिकेच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत बीएसयुपी विभागाला माहिती अधिकारात माहिती विचारून या योजनेतील किती निधी शासनाला परत पाठविला? याची माहिती घेतली तेव्हा, ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
यामधील १० कोटी ८० लाखांचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात , तर १०० कोटी रुपयांचा निधी भाजपच्या सत्ताकाळात सरकारकडे परत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएसयुपी ‘ योजनेचे महापालिकेचा २० टक्के , केंद्र शासनाचा ५० टक्के व राज्याचा २० टक्के व रहिवाशांचा १० टक्के हिस्सा असे स्वरूप असते.
त्यानुसार भाजप सत्तेत आल्यानंतर महापालिकेने ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी आयुक्तांच्या मंजूर प्रस्तावानुसार १०० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र निवारा नावाने धनादेशाद्वारे परत पाठविला. राज्य शासनाच्या जेएनएनयुआरएम, म्हाडा येथील मुख्य अभियंत्यांच्या पत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेत असताना १९ जोनवारी २०१५ रोजी १० कोटी ८० लाखांचा धनादेश परत करण्यात आला आहे.











