न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- कारचोरी प्रकरणामध्ये तक्रारदारास पोलिसांनी विचित्र वागणूक दिल्याने तक्रारदाराने थेट पोलिस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे धाव घेतली. आयुक्त पद्मनाभन यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी, देहूरोड आणि नियंत्रण कक्षातील अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, उमेश चौधरी यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे १२ लाखांची अलिशान कार विक्रीसाठी आली होती. चोरट्यांनी कारची टेस्ट ड्राइव्ह घेण्याचे बहाण्याने २८ मार्च रोजी कार चोरून नेली. महिनाभर चौधरी आणि त्यांचे मित्र ठिकठिकाणी कारचा शोध घेत होते. दरम्यान चौधरी यांच्या मित्राला चोरीला गेलेली कार २८ एप्रिल रोजी टेल्को रोड परिसरात दिसली.
मात्र, कारचा नंबर दुसरा होता. त्यामुळे त्यांनी मोबाइलवरील एका अॅपवर कारचे डिटेल्स तपासले असता, चौधरी यांची कार दुसरी नंबर प्लेट लावून फिरविली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौधरी यांच्या मित्राने या कारचा पाठलाग सुरू करीत पोलिसांना फोन केला. तसेच त्यांनी पोलिस नियंत्रणकक्षाला देखील संपर्क केला. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी दोन तासांनी येऊन चौधरी यांच्या मित्रांना उलटसूलट प्रश्न केले.
त्यांनी पुन्हा नियंत्रणकक्षाला संपर्क केला. पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. चोरीला गेलेली कार २९ एप्रिलच्या रात्री देहरोड पोलिस ठाण्यातील एका फौजदाराने तळवडे परिसरात अडवली. कार व चालकाला घेऊन ते पोलिस ठाण्यात आले. या सर्व प्रकारानंतर शुक्रवारी (दि. ३) रोजी ही कार चौधरी यांची असल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कार चोरीचा योग्य गुन्हा दाखल असलेल्या पिंपरी पोलिस ठाण्यासह देहूरोड पोलिस ठाणे आणि नियंत्रणकक्षातील अधिका-यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.











