न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणखी २२ शाळांममध्ये शुक्रवार (दि. १०) रोजी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
या कामाचे भूमिपूजन शहराचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते चिखली येथील महापालिका शाळेत होणार आहे. यापूर्वी इसीए, महापालिका आणि सीएसआर अंतर्गत मदत करणा-या कंपन्यांच्या मदतीने शहरातील एकूण १३ शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आला आहेत.
शहरात पडणारा सरासरी पाऊस अर्थात ७०० मिली पावसाचे आकडे जोडल्यास या १३ शाळा सरासरी २८ लाख ४१ हजार लिटर पाणी जमिनीत जिरवत आहेत. या नव्या २२ शाळांच्या छताच्या माध्यमातून एकूण ५२६०० चौरस फुटात जमा होणारे ३१ लाख २८ हजार लिटर पाणी आणखी जमिनीत मुरवले जाणार आहे. उल्लेखनीय बाब अशी की, शहरातील कित्येक इमारती, घरे आणि पालिकेच्या इमारतींवर देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा उपलब्ध नाही. याबाबत कोणी अधिक स्वारस्य घेत नाही. परंतु, इसीएने घेतलेल्या पुढकारामुळे महापालिकेच्या १३ शाळा अनमोल असे पाणी वाचवत आहेत आणि त्यात आणखी २२ ची भर पडणार आहे, अशी माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली आहे.











