न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारून महिला पोलिसाची आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. अनुष्का सुहास केदार (वय २०, रा. लक्ष्मीनारायणनगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलिस महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली.
दोन दिवसांपासून त्या कर्तव्यावर देखील गेलेले नव्हत्या. साधारण साडेतीन-चार वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरातून इंद्रायणी येथील पुलावर आल्या. त्या पुलावरूनच त्यांनी आपल्या मित्राला फोन केला. ”मी आत्महत्या करत आहे”, असं सांगून त्यांनी इंद्रायणी नदी पात्रात थेट उडी घेतली. हा सर्व प्रकार एका तरुणाने पाहिला. त्यानंतर त्याने या महिला पोलिसाला इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यात त्याला यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे.












