न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी व महिला उद्योजकांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत महिला उद्योजकांनी बनवलेले पदार्थ व त्यांच्या विक्री व्यवस्थेसाठी क्लस्टर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मॉलची संकल्पना राबविण्यासाठीही विविध क्षेत्रातील महिलांनी पुढाकार घेतला.
या बैठकीस पिंपरी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर, पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या महिला उद्योजक माधुरी गुरव, सुलक्षणा उभारे, दीपाली जाधव, छाया टिळेकर, भावना पाटील, उद्योजक बनराव भोर, प्रवीण शिंदे, प्राध्यापक देशमुख व महिला सदस्य उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सादर केले. चॉकलेट, मसाले, जाम, चिवडा, पापड, लोणचे, पोहे, पॅकिंग, पोळी-भाजी तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, ड्रेस, डिझायनिंग पिशव्या, अशा विविध वस्तूंचा त्यात समावेश होता.
अध्यक्ष अभय भोर महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिलांना सक्षम करण्यासाठी शहर विकास आघाडीतर्फे व फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे लवकरच पिंपरी शहरात महिला परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व भागातील महिला उद्योजक एकत्र येऊन, महिलांसाठी एक प्रशस्त व्यासपीठ व विक्री व्यवस्थेसाठी महिला संकुल तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच काही गटांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहेत. जिल्हा उद्योग केंद्र, पंतप्रधान योजना तसेच काही शासकीय योजनांची माहिती देऊन, महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. औद्योगिक परिसरातील कंपन्या, शासकीय कार्यालय, बँका, एसटी स्टँड, रेल्वे स्थानक, कॉलेजेस, अशा अनेक क्षेत्रात त्यांना विक्री व्यवस्थेसाठी मदत केली जाणार आहे.


















