- मेळाव्याद्वारे एकूण ५७५ प्रशिक्षणार्थींना कार्य प्रशिक्षणाची संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- शहरातील युवांना कार्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेसारख्या संस्थेत काम करण्याचा अनुभव युवांना मिळणार असून हा अनुभव त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी कार्यक्षम बनविण्यास देखील मदत करेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने आज मोरवाडी,पिंपरी येथील दिव्यांग भवनात कार्यप्रशिक्षण उमेदवार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभास पुणे येथील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, बाबासाहेब गलबले, उपआयुक्त विठ्ठल जोशी, संदिप खोत, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, किरण मोरे, अजिंक्य येळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, महापालिका कर्मचारी तसेच रोजगार मेळाव्यास आलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील गरजू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे. औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते. ही गरज ओळखून राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत युवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कार्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार आहे. महापालिकेच्या विविध भागांमध्येही अशा कुशल युवांची गरज असून मेळाव्याद्वारे एकूण ५७५ प्रशिक्षणार्थींना कार्य प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील औद्योगिक आस्थापनांनाही या योजनेअंतर्गत युवांना संधी देण्याबाबत महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले तसेच मेळाव्याला उपस्थित उमेदवारांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य, मुलाखतीला कसे सामोरे जावे, स्वतःला उत्तम पद्धतीने कसे सादर करावे या महत्वाच्या गोष्टींवर देखील काम करणे गरजेचे आहे, असेही मत जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या सुमारे २३ विभागांमध्ये ५७५ प्रशिक्षणार्थींच्या जागा भरण्यासाठी एकत्रितपणे आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी १० वी, १२ वी, पदवीधर तसेच उच्चशिक्षित युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने मेळाव्याच्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग, उद्यान विभाग, समाज विकास विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग यांना १० स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामध्ये लिपीक पदाच्या ५५, शिपाई पदाच्या ४३, माळी पदाच्या ६०, फिल्ड सर्व्हे इन्युमरेटर पदाच्या २६१, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या ४०, डिटीपी ऑपरेटर पदाच्या ४, स्थापत्य अभियंता पदाच्या ७०, विद्युत अभियंता पदाच्या ७, वायरमन पदाच्या ६, आरोग्य निरीक्षक पदाच्या ४ तर मल्टी टास्कींग स्टाफच्या २५ पदांचा समावेश आहे. यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विभागनिहाय उपलब्ध पदांसाठी लावण्यात आलेल्या सर्व स्टॉल्सची पाहणी केली. तसेच संबंधित स्टॉल्सवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या युवांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेच्या समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती, रोजगार मेळाव्याचा उद्देश, स्टॉल्सची माहिती तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया आदींबाबत माहिती विषद केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.