न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरात पवना नदीकाठी विसर्जन घाट आहेत. गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
परिसरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे, बैठी घरे आणि सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्येने या घाटांवर गणपति विसर्जन करावयास येत असतात. या काळात कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून त्या दृष्टीने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील प्रत्येक विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणार्या गणेश भक्तांसाठी गणपती आरती करण्याची व्यवस्था करणे, घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसविणे, घाटांवर आवश्यक अशी विद्युत दिवे लावणे, गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कुत्रीम हौदाची रंगरंगोटी करून स्वच्छ व नीटनिटके करणे, अत्यावश्यक सेवेसाठी २४ तास एक रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विसर्जन घाटांवर नियमितपणे एक बचाव पथक नियुक्त करणे जेणेकरून विसर्जन दरम्यान होणारे जीवघेणे अपघात टाळता येतील तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.














