न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- दिघीमध्ये अद्यावत अग्निशामक केंद्र होणार आहे. या केंद्राच्या कामाचे भूमीपूजन भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे दिघी व बोपखेल परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे दिघी – बोपखेल परिसरात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या परिसरातील लोकसंख्या 70 हजारांहून अधिक आहे. दिघीगावचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1997 ला समावेश झाला. यावेळी झालेल्या डीपी प्लॅनमध्ये 37 आरक्षणे जाहीर करण्यात आली. परंतु, यामधील शाळेची इमारत वगळता एकही आरक्षण विकसित करण्यात आले नव्हते. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आरक्षण ताब्यात घेऊन विकसित करण्यावर भर दिला.
दिघी-बोपखेल परिसरात एखादी आग लागण्याची दुर्घटना घडल्यास येथील नागरीकांना भोसरीतील अग्निशमन केंद्रावर अवलंबून रहावे लागत होते. त्यात वेळ जात होता. परिणामी, आग विझविण्यास विलंब होत असे, नागरिकांचे अधिकचे नुकसान होत होते. त्यामुळे दिघीसाठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र सुरु करण्याची मागणी होत होती.

















