न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- फेरफार प्रलंबित राहिल्याच्या रागातून वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे तलाठी कार्यालयात तलाठ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणातील तलाठ्याचे नाव संतोष पवार असे आहे.
ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात येऊन कामकाज करीत बसले असता साडेबाराच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवर कार्यालयात आला. त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारवरून बाचाबाची करण्यास सुरुवात केली. काही काळाने त्याने पवार यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्या पोटावर चाकूने अनेक वार केले.
अतिरक्तस्राव झाल्यामुळे पवार जागेवरच कोसळले. त्यानंतर मोठा आरडओरडा झाला. पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचारांपूर्वीच तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, आरोपी तरुण दुचाकीवरून पसार झाला. त्याचे नाव समोर आलेले नाही. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.