न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- रस्त्यावरून जात असताना विजेची तार अंगावर पडून दोघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. ३१) सकाळी मस्के वस्ती ते मुकाई चौक या रस्त्यावर रावेत येथे घडली.
ऋषभ दीपक पोफळे (२९, रा. भूगाव, ता. मुळशी) व रामहरी धर्मा साठे (५१, रा. लोहगाव, पुणे), अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दीपक सीताराम पोफळे (५२, रा. भुगाव) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली.
एमएसईडीसीएल देहूरोड सेक्शन व एमएसईडीसीएल प्राधिकरण सब स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसांनी बीएनएस कायदा कलम १२५ अ, ब अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांचा मुलगा ऋषभ पोफळे तसेच रामहरी धर्मा साठे (५१, रा. लोहगाव) हे दुचाकीवरून मुकाई चौकाकडे जात होते. यावेळी एमएसईडीसीएलची २२ केव्ही लाइनची तार तुटुन फिर्यादी दीपक यांचा मुलगा ऋषभ याच्या अंगावर पडली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने ऋषभ आणि रामहरी हे दोघेही गंभीर जखमी झाले.