- भर चौकात खून; हल्लेखोर पसार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. यात त्यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्याबरोबरच त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वारही केले. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वनराज यांच्यावर गोळीबार केला असून, वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर सर्व आरोपी फारार झाले आहेत.
चार दुचाकींवरून आठ ते दहा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार केला आहे. आंदेकर यांच्यावर पाच राउंड फायर केल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. केईएम रुग्णालयाच्या बाहेरदेखील त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.