न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सेवेबाबत दिवसेंदिवस नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच पीमपीएमएल आणि ई-बस ठेकेदारांच्या झालेल्या बैठकीत ई- बसचे चार्जिंग संपत असेल तर बॅटऱ्या बदलाव्यात आणि ई-बस रस्त्यावर वेळेवर धावल्या पाहिजेत, अशी तंबी पीएमपीएमएलकडून ई-बसच्या ठेकेदारांना दिली.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात स्वमालकीच्या सरासरी २०० बसेस आणि ठेकेदारांच्या १,०५० बसेस आहेत. यात साधारण ४५० बसेस या ई- बस आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-बसच्या संचलनाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामध्ये ई-बसचे ब्रेकडाऊनही वाढले होते. काही गाड्यांचे चार्जिंग लवकर संपत होते. त्यामुळे फेऱ्या रद्द होण्याचे प्रकार वाढले होते.
तसेच, ई-बसवरील चालकांच्या वर्तणुकीबाबत तक्रारी येत होत्या. त्यामुळे पीएमपीएमएलकडून भाडेतत्त्वावर चालविण्यात येत असलेल्या ई-बस ठेकेदारांची बैठक बुधवारी घेण्यात आली. यावेळी पीएमपी प्रशासनाने ई-बसच्या ठेकेदाराला बसचे वेळेवर चार्जिंग करावे. बॅटऱ्या खराब झाल्या असतील तर तर त्या बदलाव्यात आणि सेवा सुरळीत द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.