न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पाषाण (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- पाषाण येथील लोकसेवा प्रतिष्ठान, पुणे व गड किल्ले सेवा संस्था, महाराष्ट्र आणि लोकसेवा ई स्कूल पाषाण यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या विविध क्रांतीचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य समरातील ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांची ओळख करून देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य समरातील क्रांतिकारकांचे समग्र माहितीपटाचे भव्य प्रदर्शन पाषाण येथील लोकसेवा स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. दि. २९, ३० व ३१ ऑगस्ट असे तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनाला एक हजारांच्या वर विद्यार्थी व नागरिकांनी भेट दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन एसबीआय बँकेचे निवृत्त अधिकारी विद्याधर देशपांडे, गड किल्ले सेवा संस्थेचे निलेश गावडे, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, लोकसेवा संस्थेचे संचालक नरहरी पाटील, संस्थेचे मार्गदर्शक मनोहर पाटील, अजय सोनवणे, रविराज फुगे, मनोज काकडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र मिळवून दिले. अशा क्रांतिकारकांचा ज्वलंत इतिहास माहीत करून घेण्यासाठी थोर क्रांतिकारकांचे ‘आझादी के दिवाने’ हे चित्र प्रदर्शन विद्यार्थी व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत विद्याधर देशपांडे यांनी व्यक्त केले.
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशाला अपरिमित हानी सोसून मोठी किंमत मोजावी लागली. या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक देशभक्तांच्या घरादारांची आणि संसाराची राखरांगोळी झाली. अनेकांनी आजन्म कारावास भोगला. त्यामुळे क्रांतिकारकांचा आदर्शवाद, त्याग, जाज्वल्य देशाभिमान सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत निलेश गावडे यांनी व्यक्त केले.
लोकसेवा संस्थेचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे संस्थेने या वर्षात महाराष्ट्रातील विविध २५ गड किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी यावेळी दिली.
क्रांतिकारकांची चरित्रे विद्यार्थी व तरुणांना नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात. क्रांतिकारकांचा इतिहास भारतात सर्वत्र पसरावा. प्रखर राष्ट्रभक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळावा आणि यातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळावी व बलशाली, सामर्थ्यशाली भारताची जडणघडण व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन विविध ठिकाणी करत असतो.
– विद्याधर देशपांडे, एसबीआय बँकेचे निवृत्त अधिकारी…दिवंगत दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या अभ्यासातून आकारास आलेले ‘आझादी के दिवाने’ तसेच हुतात्म्यांच्या जीवनाची गाथा हे प्रदर्शन समाजात देशभक्ती आणि क्रांतिकारकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे.
-निलेश गावडे, गड किल्ले सेवा संस्था, महाराष्ट्र…