न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- शिक्रापूर चाकण रस्त्यावर आणि हिंजवडीत वाहनांनी अचानक रस्त्यावर पेट घेतल्याची घटना शनिवारी पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास घडली आहे. आगीत जीवितहानी झाली नसली तरी वाहनं बेचिराख होऊन आर्थिक नुकसान झाले आहे.
शिक्रापूर-चाकण रस्त्याने चाललेल्या कारने अचानक पेट घेतला. यामध्ये कार संपूर्ण जळून खाक झाली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रस्त्याने रात्री दोनच्या सुमारास बीडहून आलेला कारचालक विकास बरगजे त्याच्या ताब्यातील (एमएच ०३ – एटी ४६२४) कारमधून कुटुंबीयांसह चाललेला असताना रस्त्याच्या मध्यभागी कारच्या पुढील भागाने अचानक पेट घेतला. यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होत वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलिस हवालदार संदीप कारंडे, महेश साबळे, गणेश खेडकर, समीर पंचमुख, अमिल कंटूप, सोमनाथ सोनवणे, गीतेश सोनवणे व नागरिकांनी कारमधील कुटुंबीयांना बाजूला करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.
हिंजवडी येथील फेज दोन मधील विप्रो सर्कलजवळ पीएमपीएलच्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक व्यावसायिक शिवाजी दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस हिंजवडीकडून फेज तीनच्या दिशेने चालली होती. विप्रो सर्कलजवळ येताच बसच्या छताकडील बाजूने धूर येऊन बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. नागरिकांनी धाडस दाखवत शिडी लावून बसच्या टपावर जाऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.












