न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- वाहनांच्या हेडलाइटमध्ये नियमबाह्य पद्धतीने बदल करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व परिवहन व उपपरिवहन कार्यालयांना दिले आहेत.
वाहनांच्या हेटलाइटची प्रकाशकिरणे कशी असावीत, याविषयी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाइटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाइट बसवितात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जणांना स्वतःचा प्राणही गमवावा लागला.
सुराज्य अभियानाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्ट या दिवशी परिवहन आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला आहे, अशी माहिती सुराज्य अभियानाचे राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.
वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाश किरणांमुळे दीपले जाऊ नयेत, यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या अंतर्गत केंद्र शासनाने वर्ष २००५ मध्ये सुरक्षा मानकांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. प्रत्यक्षात यानुसार कार्यवाही होत नसल्याचे सुराज्य अभियानाच्या लक्षात आल्यामुळे परिवहन आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून परिवहन आयुक्तांनी आदेश दिले आहेत. हेडलाइटमध्ये नियमबाह्य बदल करणाऱ्या वाहनांची पडताळणी करून दोषी वाहनचालकांवर कारवाई करावी, तसेच याविषयी जनजागृती करावी, असेही परिवहन आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना कळविले आहे.
















