न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूचक विधान केलं आहे. अजित पवारांनी यावेळी लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असल्याचे सूतोवाच केले.
“मागचं सरकार २०१९ च्या निवडणुकीत २६ नोव्हेंबरला स्थापन झालं होतं. त्यामुळे नवीन सरकार २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे असा एक नियम आहे. निवडणूक आयोग कधी निवडणूक घेईल माहिती नाही. खूप जण निधीची मागणी करत आहेत. पण आता मी निधीसाठी फाईलवर रिमार्क काहीही दिला, तरी तो मंजूर होईपर्यंत आचारसंहिता लागेल. त्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
“मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा. काहीजण बेताल वक्तव्य करतात. पण अशा वक्तव्यांचं कधीच आम्ही समर्थन केलं नाही. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं एक विधान केलं त्याचाही आम्ही निषेधच केला. सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
















