न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १९५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे.
पुणे आणि नाशिक दरम्यान १८९.६ किमीच्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करणार आहे. त्यासाठी १७ हजार ५३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. या महामार्गाचा पुणे ते शिर्डी असा १३४ किलोमीटरचा, तर शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज असा ६० किमीचा मार्ग हा चेन्नई-सुरत महामार्गाचा भाग असेल. त्यापुढे चेन्नई-सुरत महामार्ग ते नाशिक असा निफाड राज्य महामार्गाचा १८ किलोमीटरचा रस्ता असेल. या महामार्गावर ३७ किमी लांबीचे जोडरस्तेही उभारले जाणार आहेत. त्यामध्ये भोसरी येथे ३.६७ लांबीचा, रांजणगाव येथे २३.६३ किमीचा, शिर्डी येथे ८७९ किमी, एनएच ६० ला भागवत मळा येथे ०.९१ किमी जोडरस्ता प्रस्तावित आहे. या महामार्गाच्या उभारणीनंतर पुणे, नाशिक आणि मुंबई हा औद्योगिक त्रिकोण अधिक जवळ येणार आहे. तसेच पुणे- नाशिक प्रवास पाच तासांवरून दोन ते अडीच तासावर येणार आहे.
महामार्गावर ११ बोगदे…
या महामार्गासाठी १५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील १४२९.७१ हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे, तर ५३.६४ हेक्टर जमीन सरकारी आहे. तसेच ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमिनीचे आहे. यातील मुख्य मार्ग ५४ गावांमधून जाणार असून, कनेक्टर २९) गावांतून जाईल. या मार्गावर ११ बोगदे प्रस्तावित आहेत. तसेच ७ मुख्य पूल आणि ६० वायडक्टही प्रस्तावित आहेत.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य…
राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहराजवळून जाणार. महामार्गालगत मोठे कारखाने, उद्योग, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्र विकसित करण्याचा उद्देश. पुणे-नाशिक प्रवास ५ तासांवरून २ ते अडीच तासांवर येणार. प्रकल्पाचा खर्च १७,५३९ कोटी रु. प्रकल्पासाठी लागणारी जमीन १५४६ हेक्टर वन जमीन ६२.२४ हेक्टर कनेक्टरसह लांबी १८९ किमी मार्गिका ६.
















