न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- केंद्र शासनाच्या नागरी विकास विभागाच्या नॅशनल अर्बन लिडरशीप प्रोग्राम’ मध्ये (एनयुएलपी) देशातून पिंपरी-चिंचवड़ व विशाखापट्टणम या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
पालिकेने आपले धोरण, योजना व प्रकल्पासाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना’ डिजिटल व्यासपीठावर मांडल्या जाणार‘ आहेत. त्यामुळे शहराचा नावलौकिक देशपातळीवर वाढणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. पालिकेने विविध धोरण प्रकल्प व योजनांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या आहेत.
त्या नाविण्यपूर्ण संकल्पना शहरातील नागरिकांना तसेच, इतर शहरातील स्थानिक स्वराज संस्थेच्या व्यवस्थापनाला समजाव्यात म्हणून केंद्र शासनाने हे एनयूएलपी हे नवे डिजीटल व्यासपीठ तयार केले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात २३ तारखेला आणि मंगळवारी (दि. ७) रोजी पालिकेत कार्यशाळा झाली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी आयुक्त संतोष पाटील होते. डिजीटल व्यासपीठाचे सल्लागार आनंद राज यांनी पालिकेच्या इतर अधिका-यांना मार्गदर्शन केले. या योजनेसाठी सदस्य म्हणून पालिकेच्या दोन अधिका-यांची निवड करण्यात आली आहे.











