न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२४) :- आयटी इंजिनिअरला संगनमताने समाजातून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात औंध येथील सुप्रिया सोसायटीतील तब्बल १३ पदाधिकाऱ्यांसह सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपेश जुनावणे (वय ४७), दत्तात्रय साळुंखे (वय ५०), अश्विनी पंडित (वय ६०), सुनील पवार (वय ५२), जगत्राथ बुर्ली (वय ५०), अश्विन लोकरे (वय ५०), अनिरुद्ध काळे (वय ५०), सुमीर मेहता (वय ४७), संजय गोरे (वय ४५), सोनाली साहुंके (वय ४५), शिल्पा रूपेश जुनावणे (वय ४५), अशोक खरात (वय ५०) आणि वैजनाथ संत यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४४ वर्षीय आयटी इंजिनिअरने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे आयटी कंपनीत नोकरीस असून, ते औंध येथील सुप्रिया टॉवर्स येथे राहतात. २००३ मध्ये त्यांनी या सोसायटीत सदनिका विकत घेतली. २०१६ पर्यंत त्यांनी त्यांची सदनिका भाडेतत्त्वावर दिली होती. त्यानंतर ते स्वतः तेथे राहण्यास आले. त्यांना त्यांची सदनिका नूतनीकरण करायची होती. सर्व काम कायद्याच्या चौकटीत असताना आरोपींनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. इतर सभासदांनी केलेल्या कामाप्रमाणेच काम असताना कोणीही त्यांच्या घरात काम सुरू असताना घुसत होते. काम करणाऱ्या कामगारांना धमकावत होते. वकिलांच्या नोटीसही आरोपींनी पाठवली. तसेच, त्यांची फिर्यादीची प्रतिम खराब करण्यास सुरुवात केली. अन्य मुलांना त्यांच्या मुलांसोबत खेळू न देणे असे प्रकार सुरू होते, असे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, मुलीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत सादर केले, त्या वेळी तक्रारदार आणि त्यांचे कुंटुंबीय इतर सदस्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी दत्तात्रय साळुंखे नावाच्या आरोपीने खोटे आरोप करून बहिष्कृत केले. तसेच, सप्टेंबर २०१८ मध्ये गणपती उत्सवावेळी त्यांच्या पत्नीला अथर्वशीर्ष पठण करण्यापासून आडवले. तसेच, इतर कोणत्याही कार्यक्रमात भाग घेऊ दिला नाही. दत्तात्रय साळुंखे व सोनाली साळुंखे हे त्यांच्या पत्नीची क्रूर चेष्ठा करत होते. तसेच, कोणत्याही मोलकरणीला त्यांच्या घरात आरोपी काम करू देत नव्हते. त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवरूनही काढून टाकले. त्यामुळे सोसायटीतील पाणी बंद, लिफ्ट बंद अशा सूचना त्यांना मिळाल्या नाही. मुलीला तुझ्या वडिलांना पोलिसांत देईल, अशी धमकी दिली, त्यामुळे मुलगी घाबरली. याची तक्रार पोलिस ठाण्यात द्यायला जाण्यापूर्वीच सोसायटीतील महिला पोलिस ठाण्यात पोहचल्या. त्यांनी तक्रारदारांना बंदूक दाखवली. त्यांना धमकावले जात होते. तक्रारदारांची सदनिका गिळकृत करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीने नमूद केले. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
















