न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट लाभ मिळावा हा उद्देश असलेल्या उपक्रमातून आत्तापर्यंत शाळेमध्ये उपस्थित असणाऱ्या तब्बल ४९,००० विद्यार्थ्यांना रेनकोट, शूज, शालेय साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ बडोदाच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहून उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे.
डीबीटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे ३९,००० उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित १०,००० शाळेत उपस्थित
असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये किटचे वाटप करण्यात आले असून ज्यांनी शाळेमध्ये उशिरा प्रवेश घेतला अशा विद्यार्थांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये डीबीटीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य पुरवता आले आहे. ई-रूपी सारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे निधीचा कार्यक्षमतेने वापर करण्यात आला असून याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. चालू वर्षी यशस्वी झालेल्या उपक्रमामुळे भविष्यामध्येही प्रत्येक विद्यार्थ्याला अशा उपक्रमांचा लाभ होणार असून यापुढे यापेक्षा जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया
राबवू असा आम्हाला विश्वास आहे, असे शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हणाले.
















