न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२४) :- भामा आसखेड धरण परिसरात बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. तर, जलवाहिनीचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. काम संथगतीने सुरू असल्याने ठेकेदाराला नोटीसही बजावली आहे.
भामा आसखेड या प्रकल्पाच्या पाइपलाइनवर सुमारे १६२ कोटी रुपये खर्च केला जात आहे. ठेकेदाराला ऑगस्ट २०२० मध्ये कामाचे आदेश दिले. तरीही त्याने दोन वर्षे कामाला विलंब करत २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतर केवळ ३५ ते ४० टक्के काम पूर्ण आहे.
भामा आसखेड जलवाहिनीच्या कामाला गती देऊन काम वेळेत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, साडेतीन वर्ष होऊनही कामास विलंब केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावत काम पूर्ण न झाल्याने काळ्या यादीत टाकण्यासाठी सुनावणी सुरू केली. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे जुलै महिन्यांत सुनावणी पूर्ण झाली आहे. यावेळी ठेकेदाराने तीन दिवसांची मुदत मागत अहवाल सादर करतो, असे सांगितले.
भामा आसखेड प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावली होती. त्या ठेकेदाराकडून कामास विलंब झाला म्हणून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करण्यासाठी नोटीस देत सुनावणी घेण्यात आली. अद्याप ठेकेदाराने कामाच्या नियोजनाबाबत कोणताही अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करायची, याबाबत आयुक्तांना विचारून निर्णय घेण्यात येईल.
– दीपक पाटील, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा प्रकल्प विभाग
















