न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२४) :- चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने बुधवारी (दि. ११) मध्यरात्री गळा आवळून प्रेयसीचा खून करून मृतदेह रिक्षात ठेवला. याबाबत वाकड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील फरार आरोपी विनायक अनिल आवळे याला शुक्रवारी (दि. १३) वाकड पोलिसांनी शिताफिने सोलापूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवंती लकमीचंद भुंबक यांची मुलगी मयत संतोषी लकमीचंद भुंबक लग्नानंतरचे नाव शिवानी सोमनाथ सुपेकर (२८, रा. वडगाव मावळ) आहे. पतीच्या निधनानंतर मयत मुलगी काही वर्षापासून रिक्षाचालक विनायक अनिल आवळे (३५, रा. काळेवाडी) याच्या सोबत राहत होती. चारित्र्याच्या संशयावरून विनायक याने बुधवारी मध्यरात्री प्रेयसीचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह प्रेयसीचे आई-वडील राहत असलेल्या थेरगावातील सम्राट कॉलनीच्या गल्लीत रिक्षातमध्ये ठेवून आरोपी फरार झाला.
मयत मुलीच्या बहिणीने आरोपीविरोधात वाकड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटक, विजापूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी (दि. १३) आरोपी विजापूरमधून सोलापुरच्या दिशेने येत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी सराईत गुन्हेगार असून, पुणे रेल्वे, भोसरी, पिंपरी आणि वाकड या ठाण्यात त्याच्या विरोधात पाच गंभिर गुन्हे दाखल आहेत. पोलिसी खाक्या दाखविल्यावर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
















