न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन, दापोडी, काळेवाडी आणि संत तुकारामनगर (पिंपरी) या चार पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील सभेत गुरुवारी (दि. १२) केली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १८ पोलीस ठाणी आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चार पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावात बावधन, दापोडी, काळेवाडी आणि संत तुकारामनगर (पिंपरी) या चार नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश होता. तसेच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याचा आग्रह धरल्याचे चाकण येथील सभेत सांगितले. त्यानुसार या चार पोलीस ठाण्यांना मंजुरी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
नवीन पोलीस ठाण्यांची जरी घोषणा झाली असली तरी ही पोलीस ठाणी नेमकी कोणत्या जागेत होणार, तसेच नवीन पोलीस ठाणी कधी कार्यान्वित होणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे. कारण पिंपरी पोलीस ठाण्याची जागा मेट्रोच्या कामासाठी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे पिंपरी पोलीस ठाण्याच्या आणि नव्याने मंजुर झालेल्या संत तुकाराम नगर या पोलीस ठाण्यासाठीही जागा शोधावी लागणार आहे.
















