न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १५ सप्टेंबर २०२४) :- वाढते अपघात आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून तळेगाव-चाकण महामार्गावर जड, अवजड, मध्यम वाहनांना तळेगावातून सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत अशी एकूण नऊ तास जाण्या-येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी शनिवारी (दि. ७) सदर आदेश काढला.
तळेगाव, महाळुंगे आणि चाकण एमआयडीसीमुळे तळेगाव-चाकण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र-५४८-डी वर मोठ्या प्रमाणावर जड व अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे, मागचे सर्व आदेश रद्द करुन तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी वरील वडगाव फाट्यापासून पुढे स्वराज नगरी ते चाकणकडे जाणाऱ्या मार्गावर ही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच हलकी, लहान वाहने (एलएमव्ही), प्रवासी बसेस आदी वाहने वगळून इतर सर्व जड, अवजड, मध्यम वाहनांना हा आदेश लागू असेल. प्रतिबंधित वाहनांना पर्यायी मार्गाने वडगाव कमान-तळेगाव एमआयडीसी रस्त्याने आंबी सर्कल, कातवी नवलाख उंबरे- बधलवाडी- भामचंद्र डोंगर पायथ्यापासून उजवीकडे वळून, भांबोली (वासुली) फाटा एचपी चौक मार्गे चाकणकडे इच्छित स्थळी जाता येईल.
















