- अडीच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीकडून महिला कर्मचारी रंगेहाथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२४) :- उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट देण्यासाठी पाच हजार लाचेची मागणी करण्यात आली. यातील दोन हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना महा ई-सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेला रंगेहात पकडण्यात आले.
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी येथील महा ई-सेवा केंद्र येथे बुधवारी (दि. १८) ही कारवाई केली. दोघांच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्पन्नाचा दाखला तसेच डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात गेले. आमची तहसील कार्यालयात ओळख असून, दाखला काढून देण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून दोघांनी लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. शासकीय शुल्का व्यतिरिक्त पाच हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. दोन हजार ५०० रुपयांची लाच कर्मचारी महिलेने स्वीकारली. यावेळी तिला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

















