न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२४) :- पाच सराईत दिवसांपूर्वी काळेवाडीत गुन्हेगाराने माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबाराची घटना घडली. माथाडीचे काम मिळण्याच्या वादातून दोघांच्या दिशेने गोळीबार केल्याची ही घटना मंगळवारी (दि. १७) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.
अक्षय ऊर्फ बाळू लहू शिंदे (३०, रा. वाकड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासह कारचालकावर गुन्हा दाखल केला. अभिजित अमृत राठोड (१९, रा. रशिदवाडी, जांबे, पुनावळे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये शिंदे पूर्वी माथाडीचे काम करीत होता. त्यावेळी त्याने तेथे काही मुलांची नावे नोंदवून त्यांना कामाला लावले होते. त्यांना काम मिळत नसल्याचा त्याला राग होता.
मॉलच्या मागील बाजूच्या साहित्य वाहतूक करण्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदे कारमधून आला. त्यानंतर फिर्यादी अभिजित यांना उद्देशून म्हणाला, “तुम्ही येथे काम कसे करता, मी तुमच्याकडे बघून घेतो. येथे काम केले तर एका- एकाला गोळ्या घालतो. मी इथला भाई आहे,” असे म्हणत धमकावले. “आज जर बुवा सापडला असता तर त्याला गोळ्या घातल्या असत्या,” असे बोलून त्याने शिवीगाळ केली.
तसेच कमरेला लावलेले पिस्तूल काढून अभिजित व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या आवाजाने आजूबाजूचे लोक घाबरून पळाले. गोळीबार केल्यानंतर शिंदे पळून गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. घटनास्थळी पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडली. वाकड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शिंदे याला ताब्यात घेतले.














